Description
भारतीय आस्तिक षड्दर्शनांपैकी सांख्यदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय इतर दर्शनांना त्यांचे मत प्रस्थापित करताना या दर्शनातील सिद्धान्तांची बहुमूल्य मदत मिळालेली आहे, असे दिसते. मूळ सांख्यदर्शनाचे प्रणेते ‘कपिल मुनी’ हे होते व त्यांनी सांख्यसूत्रांची रचना केली होती. परंतु काळाच्या ओघात ही सर्व मूळसूत्रे लुप्त झाली. परंतु या सूत्रांवरील भाष्याप्रमाणे असलेल्या ईश्वरकृष्ण विरचित कारिका (श्लोक) आपल्याला मूळ स्वरूपात अजूनही उपलब्ध आहेत, हे आपले भाग्यच होय. अर्थातच सर्व कारिका उपलब्ध नसल्या तरी त्यातील बहुतांश कारिका मूळस्वरूपात उपलब्ध असल्याने सांख्यदर्शनाचे तत्त्वज्ञान आपण समजू शकतो. आज सांख्यदर्शनावरील सर्वात अधिकृत व अजूनही उपलब्ध असलेला मूळ स्वरूपातील ग्रंथ म्हणजेच ‘सांख्यकारिका’ होय. या कारिका व त्यावरील विवेचन वाचताना प्राचीन काळी आपल्या भारतीय ऋषिमुनींनी बुद्धिवादाचा आश्रय अत्यंत निर्भयतेने घेतल्याचा अनुभव येतो. या दर्शनाचा व त्यातील तत्त्वांचा, सिद्धान्तांचा उल्लेख अत्यंत प्राचीन अशा वैदिक वाङ्मयामधून, महाभारतादी ग्रंथांतून, गीतेमधून आल्याचे दिसून येते. हे दर्शन बुद्धिप्रामाण्यवादी असले तरी वेदविरोधी नाही. सांख्यदर्शन हे मूलत: निरीश्वरवादी असले तरी, व त्याने वेदांचे प्रामाण्य संपूर्णपणे जरी स्वीकारले नसले तरी या दर्शनाने वेदप्रामाण्याला काही प्रमाणात मान्यता दिली आहे. म्हणूनच या दर्शनाला भारतीय परंपरेने आस्तिक दर्शनांमधे स्थान दिले आहे.
Contributors : Ishwarkrishna, Dr. V. V. Karambelakar