मंदिर : सेवा आणि धर्माचे प्रसार केंद्र (Mandir Seva Ani Dharmache Prasar Kendra)

SKU EBM259

Contributors

Swami  Muktidananda, Swami Omkareshananda

Language

Marathi

Publisher

Ramakrishna Math, Nagpur

Pages in Print Book

20

Print Book ISBN

9789385858796

Description

भारतवर्षाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य अक्षुण्ण राखण्यामध्ये मंदिरांनी मुख्य भूमिका निभावली आहे. आपण म्हणू शकतो की समाजाला सुबुद्ध बनवण्याचे, सामान्य लोकांच्या अस्थिर मनाला दृढ व स्थिर करण्याचे आणि त्यांच्या हृदयामध्ये श्रद्धा-भक्ती जागवण्याचे कार्य मंदिरांद्वारे समर्थपणे होत आहे. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवाचे क्षितिज विस्तारीत आत्मविकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असते. साधारण लोकांसाठी सुरुवातीला मूर्ती, प्रतीके, विधिनिषेधादी नियमबद्धता, पूजाविधी यांची आवश्यकता असणे स्वाभाविकच होय. व्याकुळ जीवमात्रांना या दिशेने नेत, शांतिलाभ करवून देण्यात व त्यांच्या हृदयातील तीव्र आकांक्षांची पूर्ती करवून देण्यात मंदिरांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. परंतु अतिसंकीर्णतेमुळे आधुनिक समाजासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. आज आपल्याला चिंतन करावयाचे आहे की आपल्या जीवनामध्ये संघर्ष करीत असलेल्या गरीब आणि सामाजिक दृष्टीने मागासलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या मंदिरांचा सहभाग कसा असला पाहिजे? हजारो वर्षांपासून मूकपणे सर्व प्रकारचा त्रास सहन करीत, आपल्या परिश्रमाने देशाचे मस्तक उन्नत ठेवणाऱ्या मंदिरांची निर्मिती करणाऱ्या – तरीदेखील सामाजिक दृष्टीने मागासलेल्या लोकांप्रती स्वामी विवेकानंद म्हणतात की ‘अशा लोकांसाठी सरकार आर्थिक सोयी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करू शकते परंतु जेव्हा ते आपली अस्मिता पुन्हा प्राप्त करतील तेव्हाच या सामाजिक दृष्टीने मागासलेल्या लोकांचा वास्तविक भाग्योदय होईल.’ पुनश्च स्वामी विवेकानंद म्हणतात की ‘त्या लोकांना आपल्या देशाच्या महान सनातन धर्माविषयीच्या संस्कृतीचे शिक्षण प्रदान करून, त्यांना समाजाच्या धार्मिक जीवनामध्ये समाविष्ट करून घेण्यानेच ते आपला आत्मसन्मान पुन्हा प्राप्त करू शकतील.’ या दिशेने आपल्या मंदिरांनी सक्रिय भाग घेण्याची आवश्यकता आहे.  शहरांमध्ये अनेक संप्रदायांच्या विविध मंदिरांमध्ये मध्यम वर्गाचे लोक अत्यधिक संख्येने येत असतात. त्यांनी फक्त पूजादी धार्मिक अनुष्ठानांमध्ये भाग घेतल्यास जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक ज्ञान त्यांना प्राप्त होणार नाही. म्हणून सामाजिक उपयुक्तता व जीवनाची सार्थकता हे उद्देश समोर ठेवून जर आपण मंदिरांना धर्म आणि अध्यात्म-ज्ञान यांचे प्रसारकेंद्र करण्याच्या उद्देशाने उपेक्षित जनसमुदायासाठी सेवास्थानांच्या रूपांमध्ये परिवर्तित करण्याच्या दिशेने प्रयत्न केल्यास मंदिरांचा उद्देश आणि कार्यव्याप्ती यांचा विस्तार होईल यात काहीही संशय नाही. आपल्या समाजाच्या प्रगतिशील वाटचालीसाठी मंदिरे अनमोल ऊर्जाकेंद्रे होतील. अर्थात ज्ञानप्रसार आणि सेवाकार्ये यांना सांप्रदायिक पूजाविधींसोबत समन्वित करण्याच्या दिशेने आपल्या मंदिरांनी स्वतःला समर्पित केले पाहिजे. यासाठी समाजाविषयीची जागरूकता आणि आपल्या संस्कृतीच्या प्रसाराचा उद्देश घेऊन एक देशव्यापी नवीन भावधारा प्रवाहित केली पाहिजे – हाच आमच्या म्हणण्याचा आशय आहे. याचसाठी प्रामाणिकपणे चिंतन करून, चर्चा करून ही पुस्तिका सुज्ञ वाचकांसमोर आम्ही प्रस्तुत करीत आहोत.

Contributors : Swami Muktidananda, Swami Omkareshananda